कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरातील घटनेचे कारण देऊन महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड आणि अन्य भागांत विनापरवानगी मोर्चे काढून हिंदूंवर हल्ले करण्यात आले. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षड्यंत्र ?’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या चर्चेत अमरावती येथील दैनिक नवभारतचे उपसंपादक अमोल खोडे म्हणाले की, अमरावती येथे सर्व नियम धाब्यावर बसवून काढलेल्या मोर्च्यात धर्मांधांनी तलवारी, हत्यारे घेऊन हिंदू व्यापार्‍यांना लक्ष्य केले. संपूर्ण शहरात उत्पात माजवला होता. या उग्र जमावाला थोपवण्यास पोलीस-प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले.

त्रिपुरा येथील ‘हिंदु जागरण मंच’चे प्रदेशाध्यक्ष श्री. उत्तम दे म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदू आणि मंदिरे यांवर होणार्‍या अत्याचारी आक्रमणांच्या विरोधात त्रिपुरामध्ये ठिकठिकाणी शिस्तबद्ध मोर्चे काढण्यात आले; मात्र राष्ट्रविरोधी शक्तींनी काही प्रसारमाध्यमांना हाताशी धरून मुसलमानांवर अत्याचार झाल्याचे खोटे चित्र निर्माण केले.