कोल्हापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी पतंगच्या मांज्यामुळे शेकडो पक्षी जखमी होतात. पतंगासाठी वापरण्यात येणारा चायनीज मांजा दोरा पक्षांच्या पायात तर कधी पंखात अडकून ते त्यांच्या जीवावर बेतते. यासाठी बाजारातील अशा चायनीज मांजा दोऱ्याची विक्री करण्यास बंदी घालावी. तत्पूर्वी संबंधित दुकानदार आणि व्यापारी यांचे प्रबोधन करावे, अशी मागणी समाजमन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबातचे निवेदन महापालिकेच्या पर्यावरण अधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की लहान, मोठी मुले पतंग उडवतात. पण अनेक लहान मुले यासाठी कळत, नकळत मांज्या दोरा विशेषतः चायनीज दोरा वापरतात. पतंग कापल्यावर ते कुठेही जाऊन पडतात. बहुतेक झाडावर पक्ष्यांचं घरटे असतं. या घरट्यांमध्ये पतंगाचे दोर पक्षांच्या पंखात, पायात अडकतात. त्यामुळे ते जायबंदी होतात. त्यामुळे दुर्दैवाने पक्षी, प्राणीमित्र वगळता कोणाला काहीच सोयर सुतक नसते. यंदा कोल्हापूरमधील पांजरपोळमध्ये काही जखमी पक्षांवर उपचार सुरू असून काही बरे झाले आहेत. यात केवळ पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून जखमी झालेले अधिक पक्षी आहेत. त्यामुळे या मांज्यावर लवकरात लवकर बंदी घालावी, अशी मागणी समाजमन सामाजिक संस्थेने केली आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे, सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे, प्रवीण राऊळ, डॉ. राजकुमार बागल उपस्थित होते.