कळे (प्रतिनिधी) :  धामणीखोऱ्यातील ग्रामीण मार्ग क्र.१२६ आंबर्डे-हरपवडे फाटा ते वेतवडे गावासह आसपासच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

धामणी खोऱ्यातील आंबर्डे ते वेतवडे ही गावे व आसपासची एकूण १० गावे आंबर्डे धरणामुळे जोडली गेली आहेत. पलीकडील हरपवडे, निवाचीवाडी, आंबर्डे येथील नागरिकांना वेतवडे येथील केडीसी बँक आणि शेतकरी संघात कामानिमित्त सतत यावे लागते. पण रस्त्याची दुरावस्था झाल्याने तसेच जागोजागी रस्ता खचल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सध्या ऊस वाहतूक सुरू झाल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून नवीन रस्त्यास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी नागरिकांतून तसेच वाहनधारकांतून जोर धरू लागली आहे.