कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑनलाईन विमा पॉलिसी काढण्यासाठी आकर्षक ऑफरचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत हाणून पाडला. या प्रकरणी मोहन चाळके (रा. शाहूपुरी परिसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहन चाळके विमा पॉलीस काढण्यासाठी  ऑनलाईन साईटवर विमा पॉलिसीची माहिती घेत होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने हिंदीतून फोन करून आम्ही ऑनलाईन पॉलिसी काढून देतो. तसेच लगेच पॉलिसी काढाल, तर आकर्षक ऑफर असल्याचे सांगून त्यासाठी तुम्हाला तत्काळ १५ हजार ५०० रुपये इतकी रक्कम आमच्या कंपनीच्या खात्यावर भरावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर चाळके यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून रक्कम जमा केली. पैसे भरल्यानंतर सदर अनोळखी इसमाने संपर्क करण्यास टाळाटाळ करुन काही दिवसातच आपला संपर्क क्रमांक बंद केला.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चाळके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस अंमलदार दिग्विजय चौगले यांनी पैसे जमा केलेल्या ठिकाणी तत्काळ पत्रव्यवहार केला. तसेच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आणि चेन्नईतील एचडीएफसी बॅंकेच्या मदतीने पैसे जमा झालेले खाते गोठवून त्यावरील रक्कम अबाधित केल्या. व संबंधित बॅंकेशी पत्रव्यवहार करुन सदरची रक्कम पुन्हा तक्रारदार यांच्या खात्यावर जमा केली.

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस मोबाईलद्वारे आपल्या बॅंकेच्या डिटेल्स तसेच ओटीपीबाबतची माहिती देऊ नये. तसेच कोणत्याही अनधिकृत साईटला आपला मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची तसेच वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.