श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) : ‘इस्रो’ने आज (शनिवार) सकाळी ११.५६ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून उपग्रह प्रक्षेपित केला. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी५४-इओएस-०६ रॉकेटने उड्डाण केले आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट-३ उपग्रह आणि ८ नॅनो म्हणजे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही २४ वी मोहीम आहे.

भूतानसाठी पाठविण्यात आलेला उपग्रह भूतानसॅट  हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह हा नॅनो आहे. यासाठी भारताने भूतानला तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. भूतानसॅटमध्ये रिमोट सेन्सिंग कॅमेरे आहेत. म्हणजेच हा उपग्रह जमिनीची माहिती देणार आहे. रेल्वे रुळ बनवणे, पूल बांधणे आदी विकास कामांनासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल. यात मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा देखील आहे. म्हणजेच सामान्य छायाचित्रांबरोबरच वेगवेगळ्या प्रकाश लहरींच्या आधारे छायाचित्रे टिपल्या जातील.

डेटा रिसेप्शन भूतानमध्ये भारताच्या सहकार्याने तयार केलेल्या केंद्रात होईल.  भारत भूतानमध्ये ग्राउंड स्टेशन विकसित करत आहे. ओशनसॅट-३ समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषण यांचेही परीक्षण करेल. हा १००० किलो वजनाचा उपग्रह आहे. ज्याला ISRO Earth Observation Satellite-6 असे नाव देण्यात आले आहे.

ओशनसॅट-१ प्रथम १९९९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर २००९ मध्ये त्याचा दुसरा उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात आला. ओशनसॅट-३ लाँच करण्याऐवजी SCATSAT-1 पाठवण्यात आला. कारण ओशनसॅट-२ निरुपयोगी झाले होते. ओशनसॅटबद्दल असे म्हटले जाते की याद्वारे समुद्राच्या सीमांवरही नजर ठेवता येते.

यासोबत चार ॲस्ट्रोकास्ट, थायबोल्ट-१, थायबोल्ट-२ आणि आनंद  उपग्रह जाणार आहेत. आनंद हा खासगी कंपनी पिक्सेलचा उपग्रह आहे. अ‍ॅस्ट्रोकास्ट हा दुर्गम भागाला जोडणारा उपग्रह आहे. थायबोल्ट उपग्रह भारतीय खाजगी अंतराळ कंपनी ध्रुव स्पेसने बनवला आहे. ते लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित केले जातील.