नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जपानमध्ये एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आबे हे भारताचे शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच आबे यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या शनिवार, दि. ९ जुलै रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ते एका ट्विटमध्ये म्हणतात, ‘भारत व जपानचे संबंध व जागतिक भागीदारीत आबेंची महत्वाची भूमिका होती. आज संपूर्ण भारत शोकमग्न आहे. या कठीण स्थितीत आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या जपानी बंधू-भगिनींसोबत उभे आहोत.’

पोलिसांनी घटनास्थळावरून यामागामी तेत्सुया नामक ४२ वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने आबेंवर का गोळीबार केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण तो आबेंच्या धोरणांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.