कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांचे जुले व ऑगस्ट महिन्याचे थकीत मानधन त्वरित मिळावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन कॉ. भरमा कांबळे व कॉ. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना देण्यात आले.

निवेदनात आशा वर्कर्सना १००० रु. प्रमाणे एप्रिल २०२१ पासूनचे थकीत मानधन त्वरित मिळावे व आरोग्यवर्धिनीमध्ये गट प्रवर्तकांना समाविष्ट करण्यात यावे, यासाठी राज्य शासनाकडे आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा, कोविड-१९ चा केंद्राकडील नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२२ अखेर मानधन अजूनही मिळाले नाही ते त्वरित मिळावे, आशा संजीवनी योजनेतील दाखल्यासाठी आशांवर निर्बंध घातले जातात. एलसीडीसी सर्व्हेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्या प्रशिक्षणाचा भत्ता देण्यात यावा, आशाप्रमाणेच गटप्रवर्तकांनाही स्टेशनरी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना आशा व गट प्रवर्तक युनियनच्या कॉ. उज्ज्वला पाटील, कॉ. संगीता पाटील, कॉ. मनीषा मोरे, भरमा कांबळे उपस्थित होते.