कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. यात राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सातत्याने खासदार धैर्यशील माने यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने दिली आहे.

पुढे बोलताना खासदार माने म्हणाले की, सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट / 8.3 एस एन एफ करिता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागेल दूध संघाने सदरची रक्कम जमा केल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्यात येतील असा आज शासन निर्णय घेण्यात आला असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.

नोव्हेंबर मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज 43.69 लाख लिटर दूध संकलीत करण्यात येते 5 रुपये प्रति अनुदानाप्रमाणे दोन महिन्यासाठी 135 कोटी 44 लाख रुपये इतके अनुदान आवश्यक असेल योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.