कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या गोठयातून पशुधन चोरीचे प्रकार वाढले आहेत. पन्हाळा तालुक्यातील खामणेवाडी आणि राधानगरी तालुक्यातील गवशी येथून एका टोळीने रात्री दोन म्हैसी पळविल्या. जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी होत आहे.

खामणेवाडी येथील विलास शकंर दळवी (वय ४०)  हे शेती व दुग्धव्यवसाय करतात. गावाबाहेर कांही अंतरावर रस्त्यालगत असलेल्या खाणणे नावाच्या शेतात  जनावरांसाठी त्यांचे गवताचे साधे शेड आहे. या गोठ्यात त्यांनी एक खिल्लार गाय, वासरू व सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेली तीस हजार किंमतीची म्हैस बांधली होती. काल  (मंगळवार) रात्रीच्या सुमारास दळवी यांनी जनावरांना वैरण टाकली आणि घरी निघून आले.

दरम्यान, रात्री चोरट्यांनी दावणीला बांधलेली म्हैस पळविली. विलास दळवी यांच्या पत्नी कल्पना दळवी या सकाळी धार काढण्यासाठी गोठयाकडे गेल्या. तेंव्हा त्यांना गोठ्यात म्हैस दिसून आली नाही. त्यांनी आपले पती विलास दळवी यांना कळविले. पावसामुळे चिखल झाल्याने कांही अंतरापर्यंत म्हैसीच्या पाऊलखुणा आढळल्या. गावकऱ्यांनी शोध घेतला, पण सापडली नाही. शेडापासून कांही अंतरावर असलेल्या म्हसोबाच्या मंदिराच्या आसपास संशयास्पद खाणाखुणा आढळल्याने म्हैस चोरीला गेली असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर दुसऱ्या घटनेत काल रात्री दोनच्या सुमारास खामणेवाडीपासून कांही अंतरावर असलेल्या पाटीलवाडी-गवशी येथूनही चोरट्यांनी बंडू दळवी यांच्या गोठ्यातून म्हैस पळविली. दरम्यान, मासेमारीसाठी निघालेल्या कांही जणांना दळवी यांच्या गोठ्यात संशयास्पद हालचाल जाणवली. कांही लोक गोठ्यात शिरले होते. तर कांही अंतरावर टेम्पो लावलेला दिसला. त्यांनी शंका आल्याने दळऴी यांच्या घरात जाऊन कळविले, पण त्यांच्या कुटुंबियांनी याकडे दुर्लक्ष केले.

सकाळी दळवी यांच्या पत्नी धार काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्या घडला प्रकार निदर्शनास आला. त्यांच्या गोठ्यातील चारपैकी एक म्हैस चोरट्यांनी पळविली होती. शोधाशोध घेतला असता तिथेच असलेल्या शेणखताच्या उकिरड्यावर टेम्पो व म्हैसीच्या पाऊलखुणा दिसून आल्या. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात नोंद केलेली नाही.