आजरा (प्रतिनिधी) : तालुक्यासह शहरात मागील १५ दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित करण्यास आजरा पोलीस एकाकी लढा देत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ३८१ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे संसार्गावर थोडा का होईना वचक बसला आहे. प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ३८ हजार रुपये दंड संबंधितांकडून वसूल करीत सामाजिक वावर आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सपोनि बालाजी भांगे यांनी दिली.
तालुका आणि शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस बाधितही वाढत आहेत. तरी गेल्या काही दिवसांत यावर नियंत्रण आल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागात संख्या वाढते आहे. आजरा नगरपंचायत प्रशासनाने शहरभर कॉलनी निहाय सर्वेक्षण करीत आढावा घेतला आहे. त्यानुसार नगरपंचायत व इतर मदतनीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरात जाऊन माहिती मिळवत अहवाल सादर केला आहे. त्याबाबतची माहिती प्रतिक्षेत आहे.
या पार्श्वभूमीवर आजरा कोविड सेंटर मधील कार्यवाहीबाबतच्या संख्यात्मक माहितीवरून काही दिवसांत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. येथे दाखल झालेल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण संख्येचा, तसेच त्यातील मयत आणि डिस्चार्ज दिलेल्यांबाबत गोंधळाचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अनेक स्तरावर घोळ निर्माण झाल्याचे कळते. संख्यात्मक माहितीबाबत संबंधित प्रशासनाची एकवाक्यता नसल्याने ही स्थिती ठळक झाल्याची मते व्यक्त होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मात्र पूर्वीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठवड्यात वरिष्ठांकडून सुरवातीस आलेल्या सूचनेप्रमाणे विना मास्क फिरणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचे धोरण जाहीर होते. मात्र त्यामध्ये वरिष्ठ स्तरावरूनच बदल झाला. सोशल डिस्टंसिंगबाबत हलगर्जी करणाऱ्या आणि सामाजिक आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्यांना ५ हजार रुपये, तर विना-मास्क फिरणाऱ्यांवर १०० रुपये दंड ठरविण्यात आला असल्याचे सपोनि भांगे यांनी स्पष्ट केले आहे. यानुसार पोलिसांची पथके नाक्यानाक्यांवर तैनात करीत संबंधित विना मास्क धारकांवर कार्यवाहीचे सत्र सुरू आहे. यानुसार ३८१ जणांवर कार्यवाही करीत शासनाच्या तिजोरीत आज अखेर ३८ हजार १०० रुपयांची भर पडली असल्याचे सांगण्यात आले.