रांगोळी (प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी ६५ व सरपंच पदासाठी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज छाननी वेळी कोणीही हरकत घेतली नसल्यामुळे सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. या निवडणुकीमुळे डिसेंबरच्या गुलाबी थंडीत राजकीय गरमागरम चर्चांनी रंगत आणली आहे.

हातकणंगले तालुक्यातील राजकीय व आंदोलनाचा केंद्रबिंदू अशी ओळख असणारे गाव म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. यंदा पुन्हा जि.प. चे माजी सदस्य राहुल आवाडे आणि भाजपचे महावीर गाट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनामध्ये लढत होत आहे. आवाडे व गाट यांच्या आघाडीतून उमेदवारी नाकारल्यामुळे युवा आघाडीच्या माध्यमातून आवाडे समर्थक बापू मुल्लाणी व प्रवीण शेट्टी यांनी आघाडीच्या विरोधात आवाहन निर्माण केले आहे.

निवडणूक कार्यक्रम झाल्या दिवसापासूनच सरपंचपदाचे उमेदवार प्रचारात सक्रिय आहेत. गावातील घरोघरी भेट देऊन त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. इच्छुकांची तोबा गर्दी असल्यामुळे व विरोधी पॅनेलचा उमेदवार पाहूनच तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नाने माघारीच्या दिवशीच उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत भरणार आहे.

आवाडे आघाडीचे सरपंचपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून संगीता नरदे यांनी हे पद भूषविले आहे. मागील सरपंचपदाचा अनुभव आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा सरपंच होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पैसाफंड बॅंकेचे संचालक आप्पासो सादळे यांची मुलगी डॉ. मनस्वी सादळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रिंगणात उतरल्या आहेत. सरपंचपदासाठी अपक्ष म्हणून ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत; परंतु सरपंचपदासाठी खरी लढत आवाडे व स्वाभिमानी गटात होणार आहे.

लढत तिरंगी दिसत असली तरी अंतिम दिवशी कोण कोण माघार घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात असावी याकरिता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. जनसामान्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे.