कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेले महापालिकेचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे दरवाजे आज (सोमवार) उघडले. यामुळे नाट्यप्रेमी आणि रसिकांतून समाधान व्यक्त होत आहे. आज शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून सुरू करणेत आले आहे.

कोविड -१९ विषाणूच्या प्रादूर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने विविध बाबींवर निर्बंध आणले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हया तील विविध कार्यक्रमांवर बंदीबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे १५ मार्चपासून भोसले नाटयगृहाकडील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नाटयगृह बंद ठेवण्यात आले होते.

आता ‘मिशन बिगीन अगेन’ या अंतर्गत नाट्यगृहे पुन्हा सुरू करण्याबाबत शासन आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र नियमानुसार, नाटयगृहाचा वापर हा आसन क्षमतेच्या ५० टक्के इतकाच राहील. मास्कविना कोणालाही नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही. प्रेक्षकांचे तापमान तपासणी, निर्जंतुकीकरण, कलाकारांची वैद्यकीय तपासणी, सुरक्षित अंतर, परिसरात स्वच्छता, थुंकण्यास मनाई, नाट्यगृहात प्रवेश करताना सुरक्षित अंतर ठेवून रांग करणे, खाद्यपदार्थांना मनाई याही नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे.