पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात ५० ग्रामपंचयतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी १० ग्राम पंचायती बिनविरोध झाल्यामुळे आता उद्या (रविवार) ४० ग्रामपंचयतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी  प्रशासनाने मतदान यंत्रणा सज्ज ठेवली असून आज (शनिवार) कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

पन्हाळा तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतीच्या २९६ सदस्यपदासाठी ६६१ उमेदवार रिंगणात आहेत. तर ११ सरपंच बिनविरोध झाल्याने ३९ सरपंच पदासाठी १०६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा जरी थंडावल्या असल्या तरी, बेरजेच्या राजकारणामुळे नाट्यमय राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर छुप्या प्रचारासाठी इच्छुक उमेदवारांनी आपापली यंत्रणा सज्ज केली आहे. आपलेच उमेदवार निवडून आणण्यासाठी गट नेत्यांची रात्रभर खलबते सुरु होती.

पन्हाळा तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या १३३ वॉर्ड मधील २९६ जागांसाठी ७२ हजार ६१८ मतदार मतदान करणार आहेत. यासाठी १५६ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर एक निवडणूक निर्णय अधिकारी, दोन सहाय्यक आणि इतर कर्मचारी असे एकूण १ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या केंद्राकडे रवाना केले. निवडणुकीचे पार्श्वभूमीवर आचारसंहिता पथक कार्यरत असल्याची माहिती तहसिलदार तथा निवडणूक नियंत्रक रमेश शेंडगे यांनी दिली.

तसेच मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पन्हाळा, कोडोली आणि कळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.