कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील शिक्षकांमधून अधिसभेवर निवडून द्यावयाच्या तीन सदस्यांच्या निवडणुकीमध्ये खुल्या जागेवर शशीभूषण बाबासाहेब महाडिक यांची, तर राखीव प्रवर्गातील अनुसूचित जमातीमधून डॉ. शंकर पोशेट्टी हंगीरगेकर आणि महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. माधुरी वसंत वाळवेकर यांची निवड झाली.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि नऊ अभ्यास मंडळासाठी निवडणूक दि.१४ नोव्हेंबर रोजी झाली. या निवडणुकीची मतमोजणी आज (बुधवारी) सकाळी आठ वाजता विद्यापीठाच्या परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये सुरू झाली.

नऊ अभ्यास मंडळांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात आली. यामध्ये मानसशास्त्र अभ्यास मंडळावर विकास सुदाम मिणचेकर, विजयमाला वीरेंद्र चौगुले आणि विनायक मधुकर वनमोरे निवडून आले. प्राणीशास्त्र अभ्यास मंडळावर सत्यवान सुबराव पाटील, लझारस प्रभाकर लंका आणि तानाजी महादेव चौगुले हे विजयी झाले. रसायनशास्त्र आणि रसायन अभियांत्रिकी मंडळावर रमेश श्रीमंत यलकुद्रे, दत्तात्रय कृष्णा दळवी आणि रघुनाथ कुशाबा माने हे विजयी झाले.

वाणिज्य अभ्यास मंडळावर उदयकुमार रामचंद्र शिंदे, रवींद्र कौस्तुभ दिवाकर आणि अमोल गोवर्धन सोनवले यांची, अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर प्रभाकर तानाजी माने, अनिल धोंडिराम सत्रे आणि जयवंत शंकरराव इंगळे यांची, तर इंग्रजी अभ्यास मंडळावर आप्पासाहेब सिध्दप्पा हरबोळे, बाळकृष्ण दादा वाघमारे, उत्तम रामचंद्र पाटील यांची निवड झाली.

भूगोल व भूशास्त्र अभ्यास मंडळावर बाळासाहेब सोबा जाधव, रत्नदीप गोविंद जाधव, अजयखान शिराज शिकलगार, तर हिंदी अभ्यास मंडळावर भास्कर उमराव भवर, संग्राम यशवंत शिंदे आणि अशोक विठोबा बाचुळकर हे विजयी झाले.