पुणे ( प्रतिनिधी ) कोथरुडमध्ये आमदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सामध्ये प्रशांत दामले यांच्या “सारखे काही तरी होतंय” हे सदाबहार विनोदी नाटक संकर्षण कऱ्हाडे यांचे तुफान गाजत असलेले “नियम व अटी लागू ” अशोक सराफ – निर्मिती सावंत यांच्या व्हॅक्युम क्लिनर सारख्या अनेक दर्जेदार नाट्य कलाकृतींचा आस्वाद कोथरूडकरांनी घेतला. “आमदार महोत्सवाचे हे तिसरे वर्ष कोथरुड मधील नाट्यरसिकांसाठी पर्वणी ठरले.


काल या महोत्सवाचा समारोप कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी मराठी नाट्य आणि सिने विश्वातील अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समस्त नाट्यरसिक कोथरुडकरांच्यावतीने करण्यात आला.

तसेच, नागरिकांच्या सुरक्षेस्तव अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कोथरुड पोलिसांचाही महोत्सवात सन्मान करण्यात आला. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी आयोजक अजित जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि महोत्सवास शुभेच्छा दिल्या.