सातारा : भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना अखेरच्या क्षणी बाराव्या यादीत उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपाने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सध्या साताऱ्याच्या उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु, साताऱ्यातून आता उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. 19 एप्रिल रोजी  उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं.

अभिजीत बिचुकले त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असल्याचे दिसून आले. ते म्हणाले, “मी एकच गोष्ट सांगतो की मी 19 तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावं अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचं आत्मपरिक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. शक्तीप्रदर्शन काय असतं? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे. येणाऱ्या लोकसभेला मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या ” असं आवाहनही  बिचुकले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही बिचुकले यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून मागील विधानसभा लढवली होती पण त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.