छ. संभाजीनगर/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महायुती आणि इंडिया आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. तर महाराष्ट्रात काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.

मेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून ही हाणामारी झाल्याचं कळतंय. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचं समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत. अशीच एक बैठक आज (२९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन गट भिडल्याचं पाहायला मिळालं.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही जण दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप करत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.