नागपूर (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूजवरील ड्रग्ज पार्टीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीलाही  सोडण्यात आले आहे. पण आम्ही त्यांचे नाव यासाठी घेत नाही आहोत कारण ते क्लीन होते. त्यांचे नाव घेऊन आम्ही त्यांना बदनाम का करावे ?, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, जे क्लीन होते, त्यांना सोडून देण्यात आले आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं किंवा ज्यांच्या मेसेजेसमध्ये काही सापडलं,  अशा लोकांना एनसीबीने अटक केली. हे ड्रग्ज आपल्या समाजाला, आपल्या मुलांना बिघडवत आहे.    त्यामुळे यावर राजकारण होऊ नये. आपल्या मुलांना बिघडवणारी ही ड्रग्जची वाईट सवय आहे.

दरम्यान,  नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर एनसीबीने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. यावेळी सोडून देण्यात आलेल्या सहा जणांमध्ये उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र असणारे पार्थ पवार होते का? असा थेट प्रश्न एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारला असता वानखेडे यांनी यावर उत्तर दिले. तुम्ही जी नावं विचारत आहात त्यावर एकच सांगू शकेल की प्रकरणाचा तपास सुरु आहे. तर नावं सांगणं योग्य ठरणार नाही. आम्ही फार जबाबदार संस्थेसाठी काम करतो. आम्ही फक्त पुरव्यांच्या आधारे बोलतो,  असे वानखेडे म्हणाले.