अमरावती – सध्या देशात लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व पक्ष नेत्यांनी जोरदार प्रचार चालू आहे. अशातच प्रचारादरम्यान नेते मंडळी आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच आता माजी कृषी मंत्री शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही. कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि निघून जातात. कुणालाही बोलता येत नाही. आज देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतो की काय? अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्‍या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक सभागृहात आयोजित इंडिया आघाडीच्‍या मेळाव्‍यात ते बोलत होते

काय म्हणाले शरद पवार..?

देशातील संसदीय लोकशाही धोक्‍यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वपक्षातील खासदारांमध्‍येही दहशत आहे. रशियात ज्‍या पद्धतीने राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्‍तासूत्रे एकट्याच्‍या हाती घेतली आहेत, ती पाहताना आपल्‍या देशात नवीन पुतिन तयार होतो की काय, ही चिंता भेडसावू लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, संसदेत आम्ही बसतो. खासदारांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये सेंट्रल हॉल आहे. त्या ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी येतात. सर्व पक्षाचे सदस्य येतात. गप्पा मारतात. तिथे पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही पाहतो, मोदी तिथून जात असल्यावर सत्ताधारी खासदार मान खाली घालतात. मोदींना दिसू नये म्हणून. इतकी दहशत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल शरद पवारांनी केला.