इचलकरंजी (प्रतिनिधी) : मोटारीतून तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा वाहतूक करणार्‍या एकाला इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली. इजाजअली अशरफअली कित्तुर (वय २४, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, चारचाकी गाडी आणि मोबाईल असा सुमारे २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इचलकरंजीतील हॉटेल ताराजवळ गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल (बुधवार) रात्री बाराच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचला होता. या वेळी पोलिसांनी चारचाकी गाडी थांबवून ती तपासली असता त्यामध्ये ५२ हजाराचा विमल, मुसाफीर पानमसाला, व्हीवन तंबाखू, रॉयल जाफरानी जर्दा मिळून आला.

याप्रकरणी वाहनचालक इजाजअली कित्तुर याला ताब्यात घेऊन पानमसाला, सुगंधी तंबाखू, चारचाकी गाडी आणि मोबाईल असा सुमारे २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नितील ढोले यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कित्तुर याला अटक केली आहे.