गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीज चोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय ४०) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून २४ हजार ६७५ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे २ लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी केली होती.

दि. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी ढोलगरवाडी येथील वीज ग्राहक भाऊराव संभाजी पाटील यांचे सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी  वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले. वीज मीटरची गडहिंग्लज येथे दि.२० नोव्हेंबर २०१५ रोजी वीज भार तपासणी करून पंचनामा करण्यात आला. या वीजभार तपासणीत वीजमीटर ७५.९४ टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा दि.२१ नोव्हेंबर २०१५ रोजी कोल्हापूर येथील वीज तपासणी प्रयोगशाळेत ग्राहकासमक्ष वीज मीटर तपासले. या तपासणीत वीज मीटरमध्ये वीज वापर कमी नोंदवला जावा, अशा पध्दतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.

ग्राहकाने २२ फेब्रुवारी २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१५ या निर्धारित १९ महिने कालावधीत २४ हजार ६७५ युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीज चोरीच्या युनिटचे आर्थिक मूल्यानुसार २ लाख ५० हजार रुपये व तडजोडीचे रक्कम १.५० लाख इतके बिल देण्यात आले होते; मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने बिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार भाऊराव संभाजी पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व १० हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणी पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक निवृत्त कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बोकील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सुनील तेली यांनी कामकाज पाहिले.