राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) परिसरात आढळून आलेले गवे नदीकाठाने घोटवडे येथील ढेरे नाळवा आणि स्टार्च प्रक्रिया एरिया या भागात गेल्याचे वन विभागाला आढळून आले आहे. तसेच येथे गव्यांचा रहिवास आढळला आहे.

या ठिकाणी आढळलेल्या पाऊल खुणांवरून मादी आपल्या पिलासहित असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वन विभागाने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, सदर परिसरात संध्याकाळी सहानंतर शेतकऱ्यांनी जाऊ नये. त्याचप्रमाणे गवा दिसल्यास त्याच्या मागे न लागता त्वरित वन विभागाला कळवावे. गवा प्राणी बिथरल्यावरच माणसावर हल्ला करू शकतो. तरी सर्व ग्रामस्थांनी स्वतःची काळजी घेऊन विभागास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास पाटील, वनरक्षक उत्तम भिसे, वनमजूर बाळू डावर, जोतीराम कवडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कातिवले आदींनी गव्यांचा शोध घेतला.