कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) यांच्‍या सहकार्याने कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटनेने कोविड – १९ निधी उभारण्‍यात आला असून या योजनेत सहभाग घेतलेल्‍या प्राथमिक दूध संस्‍थांमध्‍ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरपाईपोटी रुपये ९ लाख ५० हजार इतक्‍या रकमेचे वाटप कार्यक्रमाचे अध्‍यक्ष संघाचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील कार्यालयात करण्‍यात आले.

या कोरोना कवच निधीसाठी चेअरमन रविंद्र आपटे व संचालक मंडळ यांच्‍या सहकार्याने गोकुळ दूध संघाने १५ लाख रुपयांची मदत दिली असून, योजनेत सहभाग घेणेसाठी संघटनेने संस्‍था कर्मचा-यांकडून प्रत्‍येकी रुपये ३००/- तर दूध संस्‍थेकडून प्रति कर्मचारी रुपये ३००/- इतका निधी घेतला आहे. योजनेंतर्गत जिल्‍ह्यातील दूध संस्‍थेमधील ४१ कर्मचा-यांना कोरोनावरील उपचाराकरिता ६ लाख २० हजार,  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला १ लाख, इतर शस्त्रक्रियेसाठी २ कर्मचा-यांना ३०,०००/-  व नैसर्गीक किंवा इतर कारणांमुळे ८ कर्मचा-यांचा मृत्‍यु झाल्‍यामुळे प्र‍त्‍येकी २५,००० प्रमाणे २,००,०००/- असे एकूण ९ लाख ५० हजारांचे वितरण करण्‍यात आले. त्याचप्रमाणे तीन निवृत्‍त कर्मचाऱ्यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

या वेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष रणजितसिंह पाटील, संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, विश्‍वास जाधव, बाळासो खाडे, उदय पाटील, सौ. अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, दूध संस्‍था कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष के. डी. पाटील, उपाध्‍यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्‍वास पाटील आदी उपस्थित होते.

गोकुळ संघाकडून ११ टक्के डिव्हिडंडपोटी ५ कोटी ३ लाख २५ हजार रुपये दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर काल (शुक्रवार) वर्ग करण्यात आली आहे.