धामोड (सतिश जाधव) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जशीजशी जवळ येत आहे. तसतसे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत राधानगरी तालुक्यात या निवडणुकीचा फिव्हर वाढू लागला आहे.

मेळावे, वैयक्तिक गाठीभेटी यावर इच्छुकांनी भर देत आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच तालुक्यात कधी नव्हे इतक्या इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांना  उमेदवारी देताना कस लागणार आहे.

धामोड येथील सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे यांनी आपण या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे धामोड येथे तुळशी-धामणी परीसरातील ठरावधारकांच्या मेळाऴ्यात स्पष्ट केले आहे.

भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनी राष्ट्रवादीकडून पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे. तसेच यावेळी आपला विचार न झाल्यास वेगळा विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

भोगावती कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील (येळवडेकर) राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून इच्छुक आहेत. त्यांनी तालुक्यातील काँग्रेसच्या ठरावधारकांचे दोन मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन केले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आणि बँकेचे विद्यमान संचालक ए. वाय. पाटील हे विकास सेवा संस्था गटातून प्रमुख दावेदार मानले जातात. त्यांनी देखील आपल्या पध्दतीने रणनीती सुरू केली आहे.

एकंदरीत, निवडणुकीचा विचार केल्यास अजून जिल्हा पातळीवर नेत्यांनी पॅनेलची  बांधणी केलेली नाही. निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की ? प्रत्येक पक्ष  स्वतंत्र ताकद आजमावणार ? हे स्पष्ट झालेले नाही. तर तालुका पातळीवर स्थानिक आघाडीचे राजकारण होणार की ? वेगळी समीकरणे होणार ?  हे अद्याप  गुलदस्त्यात आहे. तरी इच्छुकांची संख्या पाहता राधानगरीत टोकाची ईर्षा पाहायला मिळणार, हे मात्र निश्चित.