कोल्हापूर (प्रतिनिधी) :  टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरी करणाऱ्याला आज (मंगळवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. सुयश उर्फ वरुण महेश हुक्केरी (वय १९, रा. राजाराम चौक, कोल्हापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चांदीचे २ कडे,  अंगठ्या ४ असा १३८१ ग्रँम वजनाचे ६४ हजार ९०७ रुपये किमतींचे चांदीचे दागिने जप्त केले.  विशेष म्हणजे तो राजाराम चौक तरुण मंडळाचा कार्यकर्ता आहे.

शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने १५ सप्टेंबररोजी पहाटे चोरीला गेले होते. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना सदर चोरट्याने दागिने चोरले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे आज  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सुयश हुक्केरी याला ताब्यात घेतले.  त्याने चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजय गोडबोले,  पो.हे.कॉ  विजय कारडे, पांडुरंग पाटील,  पी. नाईक, किरण गावडे,  कुमार पोतदार,  पो.कॉ. प्रदिप पोवार, रवी पाटील (सायबर सेल) यांनी केली.