कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिये येथील पुनर्वसन तसेच अतिक्रमण प्रश्नी सर्व पक्षीय पदाधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्यासमवेत सोमवारी (दि.१६) बैठक घ्यावी. आणि प्रश्न मार्गी लावावा, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितले.

मौजे शिये येथील गावठाण सर्व्हे नंबर २५९ व २८३ मधील पूरग्रस्तांना मिळालेल्या भूखंड तसेच अतिक्रमणप्रश्नी सातत्याने सुरु असलेल्या आंदोलन आणि पत्रकबाजीवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची शियेतील  सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज (शनिवार) भेट घेतली.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, सध्या असलेले अतिक्रमण काढता येत नसल्याने गावात आणखी सरकारी जागा सुचवा, त्याठिकाणी पुनर्वसन संदर्भात ठराव करून द्यावा. राज्य सरकार पुनर्वसनासाठी सकारात्मक आहे. यावेळी सरपंच रेखा जाधव यांनी शिये गावातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करून तत्काळ मदत देण्याची मागणी केली.

यावेळी शिष्टमंडळात माजी जि. प. सदस्य बाजीराव पाटील, माजी पं. स. सदस्य जयसिंग काशीद, विकास चौगले, जयसिंग पाटील, शहाजी तासगावकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगुले, विलास गुरव, प्रभाकर काशीद, हंबीरराव कोळी, तेजस्विनी पाटील,  मंगला कांबळे, शिवाजी रानगे, जयसिंग फडतारे, संजय सातपुते, मच्छिंद्र मगदूम, निलेश कदम आदी उपस्थित होते.