इचलकरंजी (प्रतिनिधी) : कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने इचलकरंजीतील काँम्रेड के. एल. मलाबादे चौकात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कामगार व शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला. या कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन शेती विषयक आणि कामगारांसाठी पूर्वीचे २९ कायदे रद्द करुन चार कायदे संमत केले आहेत. या नव्या कायद्यांमुळे शेतकरी आणि कामगारांच्या हक्काचे नुकसान होऊन ते उदध्वस्त होण्याचा मोठा धोका वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचे नवीन मंजूर केलेले कायदे रद्द करावेत,अशी मागणी करण्यात आली. यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच नव्या कायद्याच्या प्रतींची होळी करण्यात आली.

यावेळी प्राचार्य ए बी.पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे, धोंडीबा कुंभार, शामराव कुलकर्णी, सदा मलाबादे, प्रदीप साहू, भाऊसाहेब कसबे, सुभाष कांबळे, राजेंद्र निकम, शिवानंद पाटील, धनाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी,सदस्य सहभागी उपस्थित होते.