कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रमोद खंडागळे उपस्थित होते.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातील लोकांचे प्रबोधन व्हावे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी या मोबाईल व्हॅनवरुन शाहिरी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बरोबरच मोबाईल व्हॅनवरुन ऑडिओ क्लिपद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.