पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सहा गावांतून सदस्यपदासाठी २९, तर सरपंचपदासाठी पाच गावांतून आठ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली.

यवलूज, जाखले, काखे, माले, राक्षी, कोतोली गावातील काहीं उमेदवारांनी सदस्यपदासाठी २९ अर्ज दाखल केले आहेत. राक्षी गाव वगळता पाच गावांनी सरपंचपदासाठी देखील अर्ज दाखल केले आहेत. यातील जाखले गावातून १७ सदस्यपदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अर्जाबरोबर दहा दाखले व शपथपत्र मिळवण्यासाठी व ऑनलाईन अर्जासाठी पन्हाळ्यावर गर्दी झाली होती. बहुतेक उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवारी भरण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.