नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेने दाऊदच्या साथीदारांवर देखील बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने या सर्वांविरोधात ३  फेब्रुवारी २०२२ ला गुन्हे दाखल केले होते. यामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्वांवर शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्ड क्रिमिनल सिंडिकेट, मनी लाँड्रिंग याशिवाय चुकीच्या पद्धतीने जमीन बळकावण्याचे आरोप आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जैश आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचाही उल्लेख गुन्ह्यांमध्ये केला आहे. आता या प्रकरणी एनआयएने दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर २० लाख, तर अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दाऊद इब्राहिमने पाकिस्तानातील कराचीला आपला तळ ठोकला आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांव्यतिरिक्त भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दाऊदचा हात आहे. २००३ मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याच्यावर २५ दशलक्ष बक्षीस जाहीर केले. हाफिज सईद, मौलाना मसूद अझहर, सय्यद सलाहुद्दीन, अब्दुल रऊफ असगर यांच्यासह दाऊद हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.

मे महिन्यात एनआयएने डी कंपनीच्या दोन साथीदारांना मुंबईतून अटक केली होती. या व्यतिरिक्त तो छोटा शकीलचा जवळचा सहकारी आहे, जो पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो आणि भारतात खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे.