मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतली आहे. जालन्यातील आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाच्यानिमित्ताने राज्यातील संपुर्ण मराठा समाजाला एकत्र केले आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील तब्बल 19 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत तब्बल 19 जणांनी आत्महत्या केल्याची अधिकृत सरकारी आकडेवारी पुढे आली आहे. त्यातील बहुसंख्य आंदोलक वयाच्या तिशीच्या आतील आहेत. यामध्ये एका 17 वर्षांच्या तरुणीचाही समावेश आहे.


आंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर जालन्यात झालेल्या लाठीमारानंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले. विविध ठिकाणी आंदोलने झाली, रास्ता रोको झाला. राजकीय नेत्यांच्या वाहनांची जाळपोळ झाली. मराठा तरुण आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता, पण दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी 19 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या युवकांनी आपले जीवन संपवले आहे.