कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी 101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर दि. 23 ऑक्टोबर 2023 इ.रोजी जमा करण्यात येणार आहे.” अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांनी दिली.


आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये दि. 01/04/2022 ते 31/03/2023 या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर 2 रुपये 80 पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर 1 रुपये 80 पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूधदर फरक देण्यात येणार आहे.

यापैकी प्रतिलिटर 0.55 पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकाना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास 2 रुपये 25 पैसे व गाय दुधास प्रतिलिटर 1 रुपये 25 पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात येईल.


गोकुळकडून दिवाळीची गोड भेट..!


दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे.गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता 56 कोटी 38 लाख 19 हजार रुपये तर गाय दूधाकरीता 27 कोटी 99 लाख 82 हजार रूपये इतका दूध दर फरक

दर फरकावर 6 % प्रमाणे होणारे व्याज 3 कोटी 31 लाख 46 हजार व डिंबेचर व्याज 7 % प्रमाणे 7 कोटी 12 लाख 95 हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती 11% प्रमाणे डिव्हिडंड 6 कोटी 50 लाख 92 हजार रूपये असे एकूण 101 कोटी 34 लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे.

दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली. या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या जवळजवळ 5,200 दूध संस्थांच्या 5 लाख 50 हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे.


याबरोबर गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे महालक्ष्मी पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर,टी.एम.आर.चा पुरवठा व अनुदानावर काफ स्टार्टर, मिल्क रिप्लेसर उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहे.