कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामे करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाकडून ९ कोटी ४० लक्ष ५६ हजार १०८ रूपयांच्या अंदाजपत्रकास शासन मान्यता मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, शाहू महाराजांची इच्छा आणि शाहू प्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महापालिकेने राजर्षी शाहू छत्रपती महाराज समाधी स्मारक स्थळ नर्सरी बागेत उभारले आहे. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आता दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आवश्यक निधीस मान्यता मिळाल्यामुळे या टप्प्यात होणारे काम जलदगतीने पूर्ण होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शंभरावा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांचे कृतिशील विचार या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पर्वासाठी महाविकास आघाडी सरकारकडून ५ कोटी रुपयांचा निधी देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिला आहे.

या निधीतून शाहू समाधी स्थळ येथे दुसऱ्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण, आर्ट गॅलरी, डॉक्युमेंटरी दाखविण्याची सोय, दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान कंपाऊंड वॉल, लॅन्डस्केपिंग, पार्किंग सुविधा तसेच टॉयलेट्स बांधणी, परिसरातील सात समाधी,  दुरुस्तीसह नूतनीकरण अशी कामे होणार आहेत. हा निधी मिळवून दिल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री विश्वजित कदम व खा. संजय मंडलिक यांचे पालकमंत्री पाटील यांनी आभार मानले आहेत.