टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूर येथील टोयाटो शोरूम समोरील सेवा रस्त्यावर भरधाव कर्नाटक बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे टोप-संभापूर येथे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेळगावहून पुण्याकडे निघालेली कर्नाटक डेपोची बस (के.ए. ६३ एफ ०१३७) मध्यरात्री एकच्या सुमारास टोप गावच्या हद्दीत टोयाटो कार शोरूमसमोर आली असता बाजू देण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटून ती सेवा रस्त्यावर उलटली. या अपघातात बसमधील सुधीर भाऊसाहेब पाटील (वय ३२, रा. कुल, ता. निपाणी) हे ठार झाले.

मौला आबालाल बागवान (चिक्कोडी), रोहिणी मारूती कदम (बसर्गे), इशा बाळासाहेब कांबळे (पुणे), चंद्रशेखर लक्ष्मण गावडे (पुणे),  रूकय्या बाळून हुसेन सौदागर (बेळगाव), वाहक रविकुमार अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. चालक शंकरगौंडा भरमागौडा पाटील (हावेरी) याने निष्काळजीपणे बस चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर घातल्याने ही बस सेवा रस्त्यावर उलटली. अपघात प्रकरणी चालकाविरोधात सिध्देश्वर पुजाप्पा सुनगार (रा. जोशी, ता. धारवाड) यांनी फिर्याद दिली. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसांत झाली आहे.