कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि. १६ ते दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेचे हे  ३६ वे वर्ष आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

या कुस्ती स्पर्धा विविध ३१ गटांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये १४ वर्षांखालील बाल व १६ वर्षांखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट, तसेच १९ वर्षांखालील ज्युनिअर व सीनियर प्रत्येकी सात वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील. महिला कुस्तीगीरांसाठी ४५,५५  व ६५ किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना कुस्ती पूर्ण होताच रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कारखाना कार्यक्षेत्र, कागल तालुका, गडहिंग्लज शहर, उत्तूर, कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मर्यादित या स्पर्धा होतील. असेही त्यांनी म्हटले आहे. कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उद्ययोन्मुख खेळाडूंना संधी मिळावी, या हेतूने १९८४ पासून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या कुस्ती स्पर्धा ऑलिम्पिक पद्धतीने नियोजन करून भरवल्या जातात. दोन वर्षे कोरोना व महापुरामुळे सर्व स्पर्धा ठप्प होत्या. मल्लांसह खेळाडूंचे नुकसान न होता प्रोत्साहन मिळावे व इतरांनीही अशा स्पर्धांसाठी पुढाकार घ्यावा, यासाठी गतवर्षी बंदिस्त गोदामात ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले होते.

साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगें यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती कला जीवंत ठेवण्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनानंतर हाच वसा आणि वारसा पुढे चालविण्याचे काम समरजितसिंह घाटगे करीत आहेत.  स्व.राजेंनी कारखाना कार्यक्षेत्र व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरू केला. समरजितराजेंनी तो सुरू ठेवला आहे.