बारामती : सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये प्रथमच दोन सभा होत आहेत. एका बाजूने अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभा होत आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार पक्षाची सांगता सभा होत आहे.

शरद पवार पक्षाची सांगता सभेत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटासह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. मात्र, या सभेमध्ये बोलताना पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांची स्थिती काय होती ते सांगताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. रोहित पवार यांनी सांगितले की पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवरती बातम्या झळकत होत्या. त्यावेळी टीव्हीसमोर शरद पवार साहेब तसेच आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या. मात्र त्यांनी न डगमगता काळजी करू नका, असे सांगितलं होतं.

जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते, असे रोहित पवार यांनी सभेमध्ये सांगताच एकच सन्नाटा पसरला होता . आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते .व ते [पुढे म्हणाले परत पुन्हा असे शब्द वापरू नका, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांसमक्ष दिली.