कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांची आज (मंगळवार) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेतली व जोंधळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. ऋषिकेशचे स्वप्नातील घर बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. ऋषिकेशचे आई-वडील यांनी त्यांचा वीर मुलगा व छोट्या बहिणीने तिचा धाडसी भाऊ देशासाठी लढताना गमावला. या दु:खातून सावरण्याची ताकद जोंधळे कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना केली.

आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या भूमीने कित्येक वीर आजवर देशासाठी दिले आहेत. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संपूर्ण देश त्यांच्या दुःखात सहभागी आहे. ऋषिकेश जोंधळे यांनी दिलेले बलिदान हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी व अभिमानास्पद राहील, अशा भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल्या.