अहमदनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकांपैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लढतींपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडेही पाहिले जाते. महायुतीकडून सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत. एकमेकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच निलेश लंके यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं बोललं जात आहे.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीचे रहिवाशी आहेत. येथील मंदिरात ते राहतात, भ्रष्टाचारमुक्त भारत आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांनी जनआंदोलन केले होते. अण्णांच्या या आंदोलनामुळे देशभरातील तरुणाई एकटवली होती. तेव्हापासून अण्णांच्या शब्दाला देशात मान आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही अण्णा हजारेंच्या आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणातही अण्णांना विशेष स्थान आहे. देशासह राज्यातील सर्वच राजकारणी अण्णांचा आदर करतात, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करतात. आता, लोकसभा निडणुकांचे रणशिंग फुंकले असताना महाविकास आघाडीचे उमदेवार निलेश लंके यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत स्वत: लंकेंनी X या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचेही लंके यांनी या भेटीनंतर म्हटले आहे. अण्णांना मानणारा मोठा वर्ग अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे, निलेश लंकेंनी अण्णांची भेट घेऊन विखेंची कोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, औटी यांनी महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या नेत्याने लंकेंना डावलून विखेंना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तर, दोन्ही उमेदवारांकडून गाठीभेटीचे सत्र सुरूच आहे.