देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनच्या नळ योजनेचे काम सुरू न झाल्याने तेथील पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन काम सुरू करण्याबाबतचे लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थगित करणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी प्रशासनाने संबंधित कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून काम तात्काळ सुरु करण्याबाबतचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजनेचे काम मुदत संपूर्ण अवस्थेत आहे. याबाबत ग्रामस्थांनी 25 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेतली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आठ दिवस होऊनही काम सुरू न केल्याने साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी आज (गुरुवार) शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्या समावेत गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेतली.

विलास साळसकर यांनी, साळशी धनगरवाडी येथील नळ योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा निवेदनाद्वारे दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याप्रमाणे उपोषणाला बसावे लागेल. तसेच निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवावा लागेल असा इशारा दिला.

यावेळी गटविकास अधिकारी यादव यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी अभियंता महाजन, शाखा अभियंता सूर्यवंशी तसेच संबंधित काम करण्यात एजन्सीबरोबर चर्चा करून या कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून काम तात्काळ सुरू करावे अशा सूचना दिल्या. तर जोपर्यंत सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे व काम तात्काळ सुरू करण्याचे लेखी पत्र संबंधित ठेकेदार एजन्सीला देत नाही तोपर्यंत आम्ही निर्णयावर ठाम असल्याचे साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी यादव, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कार्यकरी अभियंता महाजन यांनी संबंधित एजन्सीला जलजीवन मिशन अंतर्गत साळशी धनगरवाडी विहिरीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व सुधारित जागेमध्ये विहीरीचे काम चालू केल्यास होणाऱ्या बदलानुसार आवश्यक ती सुधारित अंदाजपत्रक दोन दिवसात कार्यालयात सादर करावे असे लेखी पत्र दिले. यानंतर साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय तुर्तास स्थगित करीत असल्याचे सांगितले.


यावेळी गावचे उपसरपंच कैलास गावकर, प्रभाकर साळसकर वनिता खरात, विक्रांत नाईक, मंगेश नाईक, रमेश खरात, रामचंद्र खरात, बापू खरात, सुजय खरात आदी उपस्थित होते.