जयंत पाटील, विश्वजित कदम विशाल पाटलांना पाठबळ देणार की संजय पाटलांना मदत करणार

सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस आग्रही आहे. शिवसेनेने कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याने ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. तर कॉंग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत लढणार आणि जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तर नुकताच शिवसेना टाकरे गटात प्रवेश केलेले महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीने मला शब्द दिला आहे. त्यामुळे ही जागा मी लढणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या जागेवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून दबाव वाढत आहे. तर उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला आहे. विशाल पाटील आणि प्रतिक पाटील यांनी याबाबत अद्यापही भाष्य केलेलं नाही.

सांगली लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. अद्याप इंडिया आघाडीकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर झालेला नाही. गेली पाच वर्षे कॉंग्रेसचे विशाल पाटील हे लोकसभेसाठी तयारी करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढायची आणि जिंकायची यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनी ही जागा कॉंग्रेस लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पण कोल्हापूर लोकसभेची जागा कॉंग्रेसला दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे. पण कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी ही जागा कॉंग्रेसला मिळावी यासाठी दबाव टाकला जात आहे. नाहीतर सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत लढली जावी असा आग्रह धरला जात आहे.

दादा घराण्याचा उमेदवारीवर अबोला
राज्याच्या राजकारणात दादा घराण्याला आजही झुकतं माप आहे. दादा घराण्याने शब्द टाकावा आणि त्याला राज्यातील नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही असं कधी झालेलं नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे असतील किंवा सोनिया गांधी असतील. हे दादा घराण्याच्या सोबत असतील. सांगली लोकसभेची जागा लढण्यासाठी विशाल पाटील हे कॉंग्रेसकडून इच्छुक आहेत. पण त्यांनी उमेदवारी बाबत कोणतही भाष्य केलेलं नाही. माजी मंत्री प्रतिक पाटील आणि विशाल पाटील यांनी याबबत कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केकेली नाही. जर प्रतिक पाटील आणि विशाल पाटील यांनी उमेदवारीबाबत प्रमुख नेत्यांना शब्द टाकला तर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पण दादा कुटुंबीय याबाबत गप्प का आहे? असा सवाल कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

खासदार संजय पाटलांना जयंत पाटील आणि विश्वजित कदमांचे बळ
जिल्ह्याचा राजकारणात एकीकडे दादा घराणे आणि दुसरीकडे जयंत पाटील आणि स्व. पतंगराव कदम हे विरोधात असायचे. आजपर्यंतची राजकीय गणिते पहिली तर दादा घराणे आणि जयंत पाटील, कदम हे एकदिलाने कधी लढलेच नाही. जयंत पाटील आणि स्व. पतंगराव कदम यांनी नेहमी दादा घराण्याला विरोध केल्याचं बोललं जातं. तर प्रतिक पाटील आणि विशाल पाटील यांच्या पराभवालाही जयंत पाटील आणि विश्वजित कदम असल्याचे बोलले जाते. मात्र यावेळी विश्वजित कदम हे सांगली लोकसभेची जागा कॉंग्रेसला मिळावी यासाठी आग्रही असून जर कॉंग्रेसला ही जागा सुटल्यास विश्वजित कदम आणि आघाडी धर्म म्हणून जयंत पाटील हे विशाल पाटील यांच्यासाठी काम करणार की नेहमी प्रमाणे संजयकाका पाटलांना पाठबळ देणार? हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

सांगली लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा
सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतून ठाकरे शिवसेनेने आग्रह धरला आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले चंद्रहार पाटील हे नवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण कॉंग्रेसने सुद्धा ही जागा लढणार असल्याचे म्हंटले आहे. जर ठाकरे गटाचा आग्रह कायम राहणार असेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून दबाव वाढत आहे. सोमवारी सकाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांगली कॉंग्रेसचीच असा निर्वाळा दिला.

मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय नाही
कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी दिल्याने ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या जागेवर हक्क सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगलीच्या जागेचा तिढा यामुळे अद्याप सुटलेला नाही. ठाकरे शिवसेनेच्यावतीने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला असून त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशावेळी प्रचार शुभारंभाला उद्धव ठाकरे यांनी येण्याचे कबूल केले आहे. दि. २१ मार्च रोजी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ठाकरे यांची जाहीर सभा मिरजेत आयोजित करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचे नेतेही आक्रमक झाले असून गेली तीन महिने काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगलीची जागा जर ठाकरे शिवसेनेला दिली गेली तर मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय उरणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. सांगलीची जागा ठाकरे शिवसेनेला की काँग्रेसला याबाबत संभ्रम कायम आहे‌.