औरंगाबाद (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डी. लिट पदवी देऊन गौरव केला. कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी. लिट देऊन गौरवण्यात आले. यावेळी शरद पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला. ‘सुपर कॉम्प्युटर’ चे जनक विजय भटकर (कुलपती, नालंदा विद्यापीठ) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात माजी मुख्यमंत्री शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट. प्रदान करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या दीक्षान्त समारंभात ४३३ संशोधक विद्यार्थ्यांना यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा १४६ वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ४८, मानव्य विद्या १६३ व तर आंतरविद्या शाखांतील ७६ संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ज्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावे लागले. त्याच विद्यापीठाने तब्बल ३२ वर्षांनंतर डी. लिट देऊन गौरव केल्याने शरद पवार अत्यंत भावूक झाले होते.

शरद पवार यांना डी. लिट प्रदान करण्यात आली. नंतर पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठवाडा आंदोलनातील आठवणींसह विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या घटनांना उजाळा दिला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही मजबूत करण्याची मोठी कामगिरी केली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा विद्यापीठाशी मोठा संबंध होता, असे शरद पवार म्हणाले.