कागल (प्रतिनिधी) : महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? असा उपरोधिक सवाल शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हा अध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

गौरी-गणपती, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोना व महापुरासारख्या  नैसर्गिक आपत्तीने शेतकरी – नागरिक अडचणीत आले आहेत. महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घराची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

महापूर ओसरून दोन महिने लोटले, तरीही नुकसानीबाबत अजूनही पंचनाम्याचे कागदी घोडे नाचविण्यात शासकीय यंत्रणा मग्न आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या महापुरावेळी लागू केलेला मदतीचा जीआर जसाच्या तसा लागू करावा, अशी मागणी आम्ही याआधीच केली आहे. याकडे शासनाने साफ दुर्लक्ष केले आहे.

कोरोना व महापूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. आज घडीस बहुतांशी पंचनामे पूर्ण झाले आहेत. तरी शासनाने  नुकसानीची भरपाई तसेच दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे. अन्यथा, न्याय मागणीसाठी शेतकरी व नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या पत्रकात दिला आहे.