पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्याच्या ३५३ ठरावधारकांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी वाघबीळ येथील फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी येथे शांततेत मतदान पार पाडले.  

गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आ. चंद्रदीप नरके, उमेदवार चेतन नरके, अजित नरके, अमरसिंह पाटील यांनी मतदान केले. त्यानंतर सत्तारुढ गटाच्या ठरावधारकांनी एकत्र येत मतदान केले. त्यानंतर विरोधी आघाडीचे ठराव धारक एकत्र येत त्यांनी मतदान केले. दुपारी ४.३० ला १०० टक्के मतदान पूर्ण झाले होते. तर कोरोना बाधित ४ ठरावधारकांचे सायंकाळी मतदान झाले. २७७ पुरुष व ७६ स्त्री मतदारांनी मतदान केले.

दरम्यान, विरोधी आघाडीचे काही ठरावधारकांना शनिवारी रात्रीच पन्हाळा येथील दोन हॉटेलवर आणून ठेवले होते. त्यांना नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये एकत्र करत मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. तर सत्तारुढ आघाडीतील सर्व उमेदवार आंबा येथे होते. दोन्हीही आघाडीकडून आपले पारडे जड असल्याचा दावा केला जात होता.