पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही पूजा करायचा मान मिळवणारे हे राज्यातील पहिले दाम्पत्य ठरणार आहे.

आज रात्री बारा वाजता विठूरायाच्या नित्यपूजेस सुरुवात होणार असून, यानंतर देवाची पाद्यपूजा केली जाईल. या पूजेवेळी रात्री १२ वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. पहाटे २.२० वा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब मंदिरात पोहोचतील. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री संदीपान भुमरे, खासदार रणजित निंबाळकर, आ. समाधान अवताडे उपस्थित असतील.

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यावर पहाटे साडेतीन वाजता विठ्ठल सभा मंडपात उपमुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला पहाटे चार वाजता राज्यभरातून आलेल्या भाविकांना दर्शनास सुरुवात होणार आहे.