सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात आहेत. साताऱ्यात उमेदवारांसाठी नेतेमंडळींनी सभांचा सपाटा लावला आहे. शरद पवारांची साताऱ्यामधील पावसातील सभा आजही लोकांच्या डोळ्यासमोर आहे. एका सभेने संपूर्ण वातावरण बदलून टाकलं होतं. या सभेने उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज साताऱ्यात दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा समावेश आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात आज (शनिवार) राज्यातील प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे आज साता-यात राज्यातील दिग्गज नेते काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता मतदारांमध्ये लागली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सकाळी अकरा वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवार गटासमवेत राहणे पसंत केले. या मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार हे नेमकं काय बोलणार, मतदारांना कशा प्रकारे साद घालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दूसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांची दुपारी दोन वाजता बाजार समिती मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. पाटण हा शंभूराज देसाईंचा बालेकिल्ला मानला जतो. तेथे उपमुख्यमंत्री फडणवीस कोणते मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे सातारा शहरातील तालीम संघ मैदानावर जाहीर सभेस येणार आहेत. त्यापूर्वी उदयनराजेंसमवेत फडणवीस हे रॅलीत सहभागी होणार आहेत.

शरद पवारांची झेडपी मैदानावर सभा
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री येत असून दूसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील आज साता-यात येणार आहेत. साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी पाच वाजता पवार यांची जाहीर सभा होणार आहे. याच मैदानावरुन पवार यांनी गत पोटनिवडणुकीत भरपावसात मतदारांना साद घालीत श्रीनिवास पाटील यांनी विजयी करण्याचे आवाहन केले होते. आज त्याच मैदानावर साताऱ्यात शरद पवार काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार हे निश्चित.