मुंबई : राहुल गांधी लोकसभा निवडणूक अमेठीतून लढणार की रायबरेलीतून लढणार हा सस्पेन्स होता तो संपला असून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. यानंतर भाजपने राहुल गांधी यांना पराभव दिसू लागल्याने मतदार संघ बदलल्याची टीका होत आहे. कॉंग्रेसने अमेठीतून के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. यावर संजय राऊत यांनी भाजप उमेदवार स्मृती इराणींवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मला भाजप उमेदवार स्मृती इराणी यांची दया येतेय, की त्या आता राहुल गांधी यांच्याकडून नाही तर, त्यांच्या पीएकडून पराभूत होणार आहेत. “अमेठीतून अनेकांनी निवडणूक लढवली आहे. गांधी-नेहरू परिवाराशी जवळचे संबंध असलेल्या अनेकांनी निवडणूक लढवली आहे. अमेठीतून आर के धवन यांच्यासह अनेकांनी निवडणूक लढवली आहे. कधी रायबरेलीतून तर कधी अमेठीतून माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनीही निवडणूक लढवली होती. पण भाजपला कशाची पडली आहे. तुम्ही तुमची निवडणूक लढा.
मला भाजप उमेदवार स्मृती इराणी यांची दया येतेय, की त्या आता राहुल गांधी यांच्याकडून नाही तर, त्यांच्या पीएकडून पराभूत होणार आहेत”, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजप उमेदवार स्मृती इराणींवर टीका केली.

याशिवाय, “राहुल गांधी यांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. के एल शर्मा हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. वर्षोंवर्षे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. के एल शर्मा हे तळागळातील कार्यकर्ते आहेत. तसेच, जर एखादा तळागळातील कार्यकर्ता निवडणूक लढवतो तेव्हा भाजपला काय त्रास झाला. के एल शर्मा हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत. भाजप जशी बाहेरून आणते निवडणुकीत उमेदवार तसे हे थोडी बाहेरून आले आहेत. के एल शर्मा हे यंदाची निवडणूक जिंकणार आहेत”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.