श्रीधर वि. कुलकर्णी

‘विजयादशमी’ हा दिवस विजयाचा असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. अशी मान्यता आहे की, साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही दिवशी कार्य प्रारंभ झाल्यास त्यात नक्कीच यश मिळते. दसरा सण हा लोकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह आणतो, तसेच त्यांना एक चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.

हिंदू धर्मात मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. मुहूर्त म्हणजे उत्तम वेळ, शुभ वेळ ज्यात कोणतेही शुभ कार्य सुरु करता येतात. इतर वेळी कोणतेही कार्य सुरु करताना मुहूर्त पाहावा लागतो; परंतु हिंदू धर्म शास्रात अशा काही निवडक तिथींचा समावेश केला ज्यात कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या मुहूर्ताला ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ असे म्हणतात. हिंदू धर्म शास्रात साडेतीन खास मुहूर्त असल्याचे सांगितले जाते. हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहुर्तास खूप महत्त्व आहे आणि या दिवशी लोक शुभ कार्याची सुरुवात करतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात. आपल्या महत्वाच्या कामाची सुरुवात देखील या शुभ मुहूर्तावर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे साडेतीन मुहूर्त पूर्णपणे शुद्ध असल्याची लोकांची धारणा असते.

विजयोत्सव- मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांनी या दिवशी दशानन रावणाचा वध केला असे मानले जाते. त्या असत्यावर सत्याचा विजय म्हणून देशात दसरा किंवा विजयादशमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ‘विजयादशमी’ दिवशी शस्त्र पूजन, वाहन पूजन केले जाते. प्राचीन काळी राजे या दिवशी विजयासाठी प्रार्थना करायचे आणि रण यात्रेला जात असे. दसरा या शब्दाची उत्पत्ती- दसरा किंवा विजयादशमी हा शब्द ‘दश’ (दहा) आणि ‘अहं’ या शब्दापासून बनला आहे.

दसरा सणाच्या उत्पत्तीबद्दल अनेक गृहितके मांडली गेली आहेत. काही लोकांच्या मते हा शेतीचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक उगवल्यानंतर अन्नधान्याची संपत्ती घरी आणतात, तेव्हा त्याच्या आनंदाचा साजरा करण्यासाठी आणि या प्रसंगी देवाचे आभार मानण्यासाठी पूजा केली जाते. काही लोकांच्या मतानुसार हे रण यात्रेचे द्योतक आहे, कारण दसऱ्याच्या वेळी पाऊस थांबतो. नद्यांना पूर येणे थांबते आणि वातावरणात बदल घडत असतात.  हा सण नवरात्रीशी देखील संबंधित आहे. कारण हा सण नवरात्रीनंतर साजरा केला जातो आणि महिषासुराविरुद्ध देवीच्या धाडसी कृत्यांचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे.

हा सण आपल्याला वाईटावरील चांगल्याच्या विजयाची आठवण करून देतो. दसऱ्याच्या आधी नऊ दिवस ‘नवरात्री’चा उत्सव असतो. हा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचे महत्व आहे, म्हणून या दिवशी लोक नवीन कपडे, सोने व इतर वस्तू खरेदी करतात. संध्याकाळी लोक एकमेकांना भेटतात व आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात, मिठाई वाटतात, आपल्या मनातील आनंद व्यक्त करतात. म्हणून तर म्हणतात ’दसरा सण मोठा। नाही आनंदा तोटा।’