कोल्हापूर (प्रतिनिधी): गेली सव्वा वर्षे संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने कोविड रुग्ण सेवा कार्य सुरु आहे. दिनांक ३० मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७ वर्षाच्या पूर्ती निमित्य संपूर्ण देशभर “सेवा ही संघटन” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोविड रूग्णांची सेवा व त्यांच्या नातेवाईकांना मदत, आशा वर्कर सन्मान व स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. 

कोल्हापूर येथे आज ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमा मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने निवृत्ती चौक येथे आशा वर्करना प्रशस्ती पत्र व भेटवस्तू वितरीत करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सात वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा न करता ‘सेवा ही संघटन’ अशा सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करायचा आहे. आज संपूर्ण देशाभरात एक लाख गावात अशा पद्धतीचे कार्यक्रम सुरु आहेत. आशा वर्कर, नर्सेस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, बँक कर्मचारी अशा कोविड योध्यांचा सन्मान आणि सत्कार आजच्या दिवशी होत आहे.  कोविडच्या गंभीर परिस्थतीमध्ये प्रत्यक्ष लोकांच्या घरापर्यंत जाऊन कोविडच्या परिस्थितीशी भिडण्याचे कार्य आशा वर्कर महिलांच्या माध्यमातून होत आहे. अनेक अशा वर्कर कोरोनाने संक्रमित झाल्या तरीही न डगमगता हे मोठे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी जे कार्य सुरु ठेवले आहे त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले.

कोल्हापूर शहर जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये आज भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न झाले. टेंबलाईवाडी, कनाननगर झोपडपट्टी, यादवनगर मेन रोड, पद्मावती मंदिर नजीक, लाड चौक न्यू महाद्वार रोड, गंगावेश परिसर अशा मंडलातील सात ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहांची सफाई करण्यात आली.

निवृत्ती चौक, पद्मावती गार्डन, गणपतराव माने हॉल उत्तरेश्वर, राजारामपुरी ९ नंबर शाळा, सावित्रीबाई फुले रुग्णालय, गोळीबार मैदान परिसर अशा सात ठिकाणी मंडलांमधील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. सदर बाजार लसीकरण केंद्रामध्ये ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते महिलांना सन्मान पत्र व भेट वस्तू देण्यात आल्या.

मंगलधाम कार्यालय, आयसोलेशन हॉस्पीटल, पंचगंगा हॉस्पिटल, जैन मठ, शहाजी कॉलेज, सायबर कॉलेज, क.बावडा कोविड सेंटर याठिकाणी कोविड काळजी केंद्रात आयुर्वेदीक, शक्तीवर्धक काढा वितरण करण्यात आले. सी.पी.आर.व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे चपाती-भाजी वितरण करण्यात आले. 

पक्षाचे पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांनी आज विविध सामाजिक उपक्रम राबवून आजचा सेवा ही संघटन उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, गणेश देसाई, संतोष माळी, भरत काळे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, डॉ राजवर्धन  यांनी विशेष प्रयत्न केले.