कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील शासकीय वसाहत रुग्णालयात कोविड लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत असून सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. वाढत्या संसर्गाला रोखण्याकरिता गर्दी टाळण्यासाठी सुजाण नागरिकांनी स्वतःहून दक्षता घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा विळखा वाढत असताना प्रत्येक नागरिकाने योग्य ती दक्षता स्वतःहून घेणे गरजेचे आहे. मुळात इतक्या मोठ्या लस टोचणी मोहिमेला शासनाकडे किंबहुना रुग्णालय प्रशासनाकडे कर्मचारी कमी पडत आहेत. लस टोचणीसाठी आलेल्या नागरिकांना ओळीत थांबा, सामाजिक अंतर राखा, असे सांगण्यासाठी शासनाकडे कर्मचारी संख्याही नाही व तशी अपेक्षा नागरिकांनी करणे उचित नाही. म्हणून प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असले पाहिजे.

वसाहत रुग्णालय परिसरात लस टोचून घेणाऱ्यापेक्षा अन्य लोकांचीच गर्दी लस टोचणी मोहिमेला अडचण ठरत आहे. ज्यांना लस टोचून घ्यावयाची आहे त्यांनीच फक्त रुग्णालय परिसरात उपस्थित राहणे योग्य ठरते. पण काही जण रुग्णालय परिसरात काही कारण नसताना गर्दी करत असतात. अशा लोकांवर लक्ष ठेवून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला पाहिजे. तसे झाले तर विनाकारण होणाऱ्या गर्दीला चाप बसेल व कोरोनाचा संसर्गही होणार नाही.