कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग होऊन अनेकांचे मृत्यू होत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. अशा संसर्ग रोगाची लागण होऊन एखादी व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक धक्का बसू शकतो. या काळामध्ये असे कुठल्याही कुटुंबावर संकट येऊ नये, अशी आपल्या सर्वांची दृढ भावना आहे. परंतु जर अशी कोणावर वेळ आली, तर त्या कुटुंबास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आर्थिक मदतीचा आधार ठरू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेमध्ये सह्भावी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.

२०१५ साली केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या बचत खातेदारांना स्वस्त विमा योजना सुरू केली आहे. यामध्ये पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमाधारकांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख रुपये हे विमाधारकाने सुचवलेल्या व्यक्तीस (वारसास) मिळू शकतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा असा पण उपयोग होऊ शकतो की, आपण जर या योजनेपासून वंचित असाल तर आपण आपल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन आपल्या बचत खात्यामार्फत या योजनेमध्ये सामील होऊ शकता. या योजनेमध्ये वय वर्षे १८ ते ५० वर्ष असणाऱ्या व्यक्तींनाच सहभागी होता येईल. त्यांना त्यांच्या बचत खात्यामधून ३३० रुपयांचा विमा हप्ता भरावा लागेल, विमा हप्ता भरल्यानंतर ४५ दिवसांनंतर हा विमा लागू होईल. या विम्याअंतर्गत त्या विमाधारकाचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास (अपघाती मृत्यू सोडून) त्याच्या वारसदारांना २ लाख रुपये मिळू शकतात. केंद्र सरकारची ही योजना देशातील कितीतरी कुटुंबांना आधार देऊ शकते.

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना या योजनेद्वारे त्यांचे कुटुंब स्थिर स्थावर तसेच आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त लोकांनी या योजनेत सहभागी व्हावे. तसेच ज्या व्यक्तीच्या बँकेच्या बचत खात्यामधून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा या वर्षाचा ३१ मे रोजी पर्यंतचा हप्ता जर डेबीट केला असेल, तर ती व्यक्ती या विमा योजनेस पात्र राहू शकते. तसेच मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये ही रक्कम मिळू शकते. यासाठी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.